असे असावे कुंपण…
(तयारी बागेची)
निवड केलेल्या झाडांचा आकार आणि वाढ यानुसार त्यांची लागवड एकेरी किंवा दुहेरी ओळ पद्धतीने करता येते; मात्र कुंपणाची जाडी आणि आकर्षकपणा याकडे दुर्लक्ष करू नये. कुंपणासाठी झाडे लावताना दोन झाडांमधील अंतर एक मीटर राहील, अशा रीतीने ३० ु ३० ु ३० सें.मी. आकाराचे खड्डे ओळीत घेऊन, खड्ड्यात शेणखत, सुपर फॉस्फेट व माती यांचे मिश्रण भरून लागवड करावी. दुहेरी पद्धतीत लागवड करताना पहिल्या रांगेतील दोन झाडांच्या मध्यावर दुसऱ्या ओळीतील झाड येईल, तसेच कुंपणाचा आकर्षकपणा कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. बहुधा अशी कुंपणे एकाच जातीची झाडे वापरून केली जात असली, तरी वेगवेगळ्या जातींची रंगीत पाने, फुले असणारी झाडे लावून कुंपणाच्या उद्देशाबरोबरच मोहकता आणता येते.
सजीव कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या झाडांची लागवड बहुधा छाट कलम (छाटे) किंवा गुटी कलमांनी केली जाते. कुंपणासाठी फुलझाडे लावल्यानंतर व सुरवातीच्या काळामध्ये कुंपणाला आकार देताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे फुलझाडांची व शोभिवंत झाडांची वाढ होऊन कुंपण पानाफुलांनी भरगच्च दिसते.
कुंपणासाठी उपयुक्त शोभिवंत फुलझाडे
२) घाणेरी (लॅन्टेना) – विविध रंगी, छोटी फुले, गुच्छांमध्ये येतात. पानांवर तसेच खोडांवर खरखरीतपणा असतो.
३) ऍकेलिफा हिस्पीडा (लालवेणी) – लाल रंगाची वेणी (फुले) येणारे झाड, हिरवी पाने, काही जातींमध्ये पिवळसर पांढरा रंग तर काहींमध्ये फुले गुच्छांमध्ये येतात.
४) तगर – पांढऱ्या रंगाची फुले, हिरवीगार पाने, परंतु काही जातींमध्ये पानांवर पिवळ्या रंगाच्या रेषा असतात.
५) जास्वंदी – विविध आकार आणि रंगांची सिंगल आणि डबल फुले, दातेरी कडा असलेली हिरवी पाने, काही जाती पानांच्या बाबतीत पांढऱ्या किंवा पिवळ्या छटांसहित असतात.
६) अलामंडा – पिवळ्या रंगाची, घंटेच्या आकाराची, सुवासिक मोठी फुले येतात. छाटणीमुळे वेलीला झुडपाचा आकार देऊ शकता.
७) कोरांटी – जांभळी, केशरी, पिवळी, पांढरी अशा विविध रंगांत फुले येतात. खोलवट फुलाजवळ काटे येतात.
अलामंडा आणि बोगनवेलिया यांचा वापर बहुधा तारेच्या कुंपणाच्या आधाराने करतात; परंतु सततच्या छाटणीमुळे यांना झुडपांसारखा आकारही देता येतो.
सजीव कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलझाडांवर कोणत्याही किडी, रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत नाही. त्यामुळे छाटणी व नियमित पाणी याकडे दिलेले लक्ष पुरेसे असते. या फुलझाडांव्यतिरिक्त काही शोभिवंत झाडे उदा. मेंदी, कडूमेंदी, तजेलदार, छोटी किंवा मोठी हिरवीगार, भरगच्च पाने, तर विविध रंगी ऍकेलिफा आणि डुरांटा पानांचा आकार, रंग आणि दाटपणा तसेच सुरूला येणाऱ्या सुईसारख्या हिरव्या पर्णवैशिष्ट्यांमुळे सजीव कुंपणे बागेची शोभा वाढवतात.