कालव संवर्धनाचा प्रकल्प…
खारवट पाणी असलेल्या किनारावर्ती भागात उद्योजकता वाढीसाठी उपयुक्त प्रकल्प
गोव्यामध्ये खारट पाण्याचे अधिक स्रोत असून, त्याचा योग्य कार्यक्षमतेने वापर होत नाही. या पाण्याचा शेतीसाठी फारसा उपयोग होत नसला तरी मत्स्यपालनासाठी ते चांगले आहे. किनाऱ्यावरील 330 हेक्टर क्षेत्रामध्ये खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी मोठा वाव आहे. गोव्यामधील पर्यटन व्यवसाय व स्थानिक लोकांकडून मासे, कालव, झिंगे यांची मागणी सातत्याने वाढत आहे.
- कालव किंवा क्शिनॅन्नियो या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रीन मुस्सेल (Perna viridis) या कवचयुक्त माशांना गोव्यामध्ये चांगली मागणी आहे.
- एक कालवाचा आकार साधारणपणे 40 ते 60 मिलिमीटर असून, सरासरी वजन 30 ते 33 ग्रॅम असते. अशा एका माशाला गोव्यातील स्थानिक घाऊक बाजारपेठेमध्ये 5 ते 8 रुपये दर मिळतो.
- ही माशांची जात खारवट असलेल्या (क्षारता 25 ते 32) पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढते.
- या माशांच्या संवर्धनासाठी गोव्यातील भारतीय संशोधन केंद्रातील संशोधकांनी प्रयत्न सुरू केले असून, त्यातून स्थानिक लोकांमध्ये उद्योजकता वाढीला चालना दिली जात आहे.
कालव संवर्धनाची पद्धती
- कालवच्या वाढीच्या विविध पद्धती आहे. त्यामध्ये रॅक, तराफा यासारख्या पर्यावरणपुरक पद्धतीचा समावेश होतो. या माशांच्या वाढीसाठी बाहेरून कोणतीही खते किंवा खाद्याचा पुरवठा करण्याची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे या संवर्धन तलावाची देखभालही सोपी असते.
- कालव संवर्धनाचा कालावधी नोव्हेंबर किंवा डिसेंबरदरम्यान सुरू होतो. या कालावधीमध्ये किनाऱ्याच्या भागामध्ये किंवा खाडीमध्ये योग्य प्रमाणात बीज (स्पॅट) स्थिर होतात.
- त्यांची वाढ पुढील सहा ते सात महिन्यांमध्ये होते. काढणी जूनपूर्वी करावी लागते. मोसमी पावसामुळे पाण्याची क्षारता कमी होऊन त्याचा कालवाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो.
प्रात्यक्षिक क्षेत्राची उभारणी
या पार्श्वभूमीवर गोवा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने अर्धबंदिस्त स्वरूपाच्या जलस्रोतामध्ये कालव संवर्धनाच्या रॅक पद्धतीचे प्रात्यक्षिक 0.6 हेक्टर क्षेत्रावर उभारले. या प्रकल्पासोबतच वराहपालनाचे एक युनिटही नोव्हेंबर 2013 सुरू करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकी एक किलो कालव बीज असलेल्या पिशव्या रॅकला बांधण्यात आल्या. या बिजांचा सरासरी आकार 28 मिलिमीटर लांब व 2 ग्रॅम वजन असा होता.
तळ्यातील पाणी, गाळ आणि कालव यांच्या वाढीच्या दर पंधरा दिवसांनी रासायनिक, भौतिक आणि जैविक प्रमाणकानुसार निरीक्षण व नोंदी करण्यात आल्या.
उत्पादन व फायदा
- सहा महिन्यांनी कालवांची काढणी करण्यात आली. 60 पिशव्यांमधून 5,760 कालवांचे (वजन 1,86.125 किलो) उत्पादन मिळाले.
- कालवाच्या सरासरी वजन 33 ग्रॅम असलेल्या प्रत्येक नगाला पाच रुपये असा दर मिळाला.
- उत्पादनासाठी झालेला खर्च 14,370 रुपये होता.
- एकूण उत्पन्न 28,800 रुपये व निव्वळ नफा 16,510 रुपये झाला.
उद्योजकता वाढीसाठी होईल फायदा
प्रात्यक्षिकामध्ये यश मिळाल्यानंतर उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये कालव संवर्धनाचा समावेश करण्यात आला. शेतकऱ्यांमध्येही कालव संवर्धनाविषयी उत्सुकता असून, पुढील वर्षी मोसमी पावसानंतर संवर्धन करण्याचे नियोजन केले आहे.
शेतकऱ्यांनी खारवट पाण्याखालील आपल्या क्षेत्रामध्ये कालव उत्पादन घेण्यासंदर्भात सुरवातीच्या काळामध्ये तांत्रिक माहिती व मार्गदर्शन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.
—————————————————————————————————————————————
स्त्रोत: अग्रोवन