नंदुरबार

‘जल.. जीवनाची’..जागृती !

वायू, जल व जमीन म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती होय. हे मानवी जीवनाचे महत्त्वाचे अंगही आहेत. या घटकांमधील जल म्हणजे मानवी जीवनच. याशिवाय जिवंत राहणे अशक्य. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता विविध सामाजिक संस्था व शासनाद्वारे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जलजागृती निर्माण करण्यात येत आहे. भविष्यामध्ये मानवाला पाण्यासाठी संघर्ष करायची वेळ येता कामा नये, याकरीता पाण्याची बचत करणे व जलसंवर्धन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी जागरुकतेने प्रयत्न करावे. म्हणून 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. 22 मार्च जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचा हेतू ‘जलसंकटावर मात व जलसंवर्धन’ महत्त्व समाजापर्यंत पोहचविणे होय.

राज्यातील तसेच देशातील विविध भागात दरवर्षी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. यामागील एक कारण म्हणजे पाण्याचा होणारा दुरुपयोग होय. तसेच जलसंवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष होय. पृथ्वीवर मुबलक प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे. परंतू पिण्यायोग्य व वापरायोग्य पाणी फारच कमी आहे. ही बाब लक्षात घेता सर्वांनी पाण्याचा नियोजनपूर्वक व काळजीपूर्वक वापर करायला पाहिजे. पूर्वी विदर्भ, मराठवाड्यासारख्या भागामध्ये जलसमस्या निर्माण व्हायची. यावर मात करण्यासाठी शासनामार्फत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ‘जलयुक्त शिवार अभियान’ योजना राबविण्यात येत आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये स्थानिक प्रशासनामार्फत टँकर पुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी लोकांना पुरविण्यात येते. आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रावरच जलसंकट ओढावत आहे.

आपल्या पुर्वजांनी पाण्याचे योग्य नियोजन केलेले होते. म्हणूनच आज आवश्यक तेवढे पाणी मिळत आहे. आपल्याला व भावी पिढीला जलसंकटाचा सामना करावा लागू नये, याकरीता आपण नेहमी पाणी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा आवश्यक पाण्याची उपलब्धता कमी होईल व जलसंकट ओढवू शकेल, असे होऊ नये याकरीता जलसंवर्धन होणे गरजेचे आहे. या गरजपूर्तीची सुरुवात स्वत:पासून व्हावयास हवी. त्याकरीता पाण्याचा कमीत कमी वापर, पाणी वापराचे योग्य नियोजन, पावसाच्या पाण्याची साठवणूक तसेच तलाव, नदी, विहीरी यामधील पाणी घाण होणार नाही याबाबतची दक्षता घेतल्यास जलसंवर्धन होणे सोईस्कर होईल. तसेच पावसाळयात पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविणे आवश्यक आहे.

शेती, उद्योग, कारखाने, व्यवसाय इ. सर्वच घटकांना पाण्याची आवश्यकता असते. या घटकांमुळेच आधुनिक सोईसुविधा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असतो. तो तसाच अखंडीत सुरु ठेवण्यासाठी पाण्याची बचत करणे व जलसाठा वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. मानवासाठी पाण्याची गरज व उपलब्ध जलसाठा या दोहोंचा विचार केल्यास जलसंवर्धन आवश्यक आहे. त्यासाठी गरज आहे ती स्वयंस्फूर्तीने कार्य करण्याची, पाण्याचे महत्त्व ओळखण्याची व जलसंवर्धनासाठी सदैव प्रयत्नरत राहण्याची. कारण पाण्याच्या पुनर्भरणाशिवाय भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होणार नाही. गेल्या दशकातील पावसाळ्याचा प्रत्यक्ष कालावधी आणि त्यातही पावसाचे कमी वेळातील प्रमाण,जास्त मिलीमिटर पडणारा धोधो पाऊस, त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रियाच कमी झाली आहे. एकीकडे अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टी, अवर्षण यांचा एकंदर विचार करता पाणी अडवून जिरवणे, त्याचा योग्य वापर, पाण्याची बचत, त्याचे पुनर्भरण आणि अतिवापरावर बंधने घालणे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.

भविष्यामधील भीषण जलसंकट टाळण्यासाठी या क्षणापासून प्रयत्न केल्यास 22 मार्च जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्याचा हेतू सफल होईल. आज कोरडी असणारी तळे उद्या थेंबा थेंबाने पाणी साचून जलमय होतील आणि जलजागृती सप्ताह फलद्रुप होईल.

लेखक – गणेश मधुकर गव्हाळे
माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूर

स्त्रोत – महान्युज

शेवटचे सुधारित : 24/07/2020

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!