महाराष्ट्रातील पर्वतरांगा – सह्याद्री, शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट व सातपुडा पर्वतरांगाबद्दल माहिती मिळावा…
महाराष्ट्रात सह्याद्री, शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट व सातपुडा या प्रमुख पर्वतरांगा आहेत. या लेखात महाराष्ट्रातील पर्वतरांगाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पर्वतरांगा
महाराष्ट्रातील पर्वतरांगा: जमिनीचा उंचसखलपणा, प्रदेशाचा उतार व त्याची दिशा आणि उंची यांच्या आधारे एखादया प्रदेशाची प्राकृतिक रचना समजते. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश असे तीन प्रमुख विभाग पडतात. महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग बेसाल्ट या अग्निज खडकांनी बनलेला आहे. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामधील एक महत्वाचा घटक म्हणजे महाराष्ट्रातील पर्वतरांगा होय. आगामी काळातील तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, पशुसंवर्धन विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातील पर्वतरांगा मधील पर्वत, पर्वताशी संबंधित जिल्हा, डोंगरावरील शिखरे यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील पर्वतरांगेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील पर्वतरांगा: विहंगावलोकन
महाराष्ट्रामध्ये शंभू महादेव, सह्याद्री, सातपुडा, नांदेड डोंगर, हरिहरेश्वर, हिंगोली डोंगर, गरमसूर टेकड्या असे अनेक छोटे मोठे पर्वत आढळतात. महाराष्ट्रातील पर्वतरांगा बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.
महाराष्ट्रातील पर्वतरांगा: सह्याद्री पर्वत
सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. 150 द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.
सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस निलगिरी पर्वत पुंजापर्यंतची श्रेणी उत्तर सह्याद्री व तेथून प्रामुख्याने पालघाट खिंडीपासूनची (खंड) दक्षिणेकडील पर्वतश्रेणी दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखली जाते. पालघाट खिंडीमुळे सह्यादीची सलगता खंडित झाली आहे. उत्तर सह्याद्रीचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात येतो. महाराष्ट्रातील या पर्वतश्रेणीमुळे कोकण व देश (पश्र्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग अलग झाले आहेत.
सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या: सह्याद्रीत उगम पावणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांमध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी या प्रमुख नदया आहेत. याशिवाय इतर असंख्य पूर्ववाहिनी नदया सह्याद्रीच्या रांगांमध्ये तसेच त्यांच्या फाटयांमध्ये उगम पावून मुख्य नदयांना जाऊन मिळतात. सह्याद्रीचे पूर्वेकडे गेलेले फाटे दुय्यम जलविभाजक आहेत. महाराष्ट्र राज्यातून वाहणाऱ्या पांझरा, गिरणा, कादवा, दारणा, प्रवरा, मुळा, घोडनदी, नीरा, कोयना, वारणा, पंचगंगा इ. उपनदयांचा उगमही सह्याद्रीतच होतो.