राजापूर शहरात बिबट्याचा वावर…
राजापूर-(प्रतिनिधी) – येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी समर्थ नगर (भटाळी) रस्त्यावर राजापूर नगर वाचनालयासमोर रात्रीच्या सुमारास, तर बाजारपेठ रस्त्यावर सकाळी बिबटय़ाचा स्वैर वावर नागरिकांना दिसून आल्याने एकच खळबळयुक्त भीती व्यक्त होत आहे.
शहराच्या विविध भागांत बिबटय़ाच्या वावराबाबत प्रत्यक्षदर्शीनी वन विभागाला कळवले असले, तरी मानवी काळजीपेक्षा बिबटय़ांचे संवर्धन याला प्राधान्य असल्याने वन विभाग सुस्त असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाला दिली जाणारी आर्थिक मदत याबाबत शासन घोषणा करताना दिसते, मात्र नागरी वस्तीतील बिबटय़ाच्या वावराबद्दल सातत्यपूर्ण उपाययोजना करताना वन विभाग दिसत नाही. यामुळे आपला जीव वाचवण्याची जबाबदारी आपली, अशी आफत जनतेवर ओढवलेली आहे. याचा प्रत्यय कायमस्वरूपी समर्थनगर येथील नागरिक घेत आहेत. याच भागात काही महिन्यांपूर्वी एका महिला महसूल अधिकाऱयावर बिबटय़ाने थेट हल्ला केला होता. त्या वेळी येथे बिबटय़ा नाहीच, असे ठासून सांगण्यात वन विभागाचे अधिकारी आघाडीवर होते.