ताज्या बातम्या

‘आत्‍मा’ संस्‍था शेतकऱ्यांचा मार्गदर्शक

भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठी सर्वसमावेशक व सहभागी धोरण राबविण्‍याबरोबरच शेतकऱ्यांना विस्‍तार सेवा पुरवून शेतकऱ्यांच्‍या गरजांवर आधारित सुयोग्‍य व आवश्‍यक मार्गदर्शनाची नितांत गरज असते. सन 1998 साली महाराष्‍ट्रात प्रायोगिक तत्‍वावर अॅग्रीकल्‍चर टेक्‍नॉ‍लॉजी मॅनेजमेंट एजन्‍सी (ATMA) म्‍हणजेच आत्‍माची स्‍थापना झाली. याविषयी जाणून घेऊया…

योजनेची वैशिष्ट्ये

  1. राज्‍यातील चार जिल्‍ह्यात प्रायोगिक तत्‍वावर सुरू केलेल्‍या कार्याचे यश पाहून सन 2005 पासून राज्‍यातील सर्व जिल्‍ह्यात आत्‍मा सुरू करण्‍यात आले.
  2. प्रत्‍येक जिल्‍ह्यात कृषी तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा म्‍हणजेच आत्‍मा ही संस्‍था शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्‍याबरोबरच शेतकऱ्यांची नेमकी गरज ओळखून मार्गदर्शनाचे कार्य करीत आहे.
  3. शेतकरी आणि शेती विकासाच्‍या कार्यक्रमांमध्ये महिला शेतकऱ्यांचा समावेश.
  4. शेतकरी मित्रामार्फत, विस्‍तार सेवा, शेतकरी सहली.
  5. आधुनिक संवाद, माध्‍यमांचा वापर व प्रशिक्षण.
  6. शेती शाळा, माहिती व संवाद.

शेतकऱ्यांना स्‍पर्धाक्षम करण्‍याच्‍या दृष्‍टीने आत्‍माच्‍या वतीने जागतिक बॅंकेच्‍या सहाय्याने महाराष्‍ट्र स्‍पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांचे गट स्‍थापन करणे व शेतकरी उत्‍पादक कंपनी हे पाऊल उचलण्‍यात आले आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांचे 1100 गट स्‍थापन करण्‍यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्‍या आठ कंपन्‍या स्‍थापन केल्‍या आहेत. कृषी विकास प्रकल्‍पांतर्गत शेतकरी गटांचे बळकटीकरण करून त्‍याचे उत्‍पादन कंपन्‍यांमध्ये रूपांतर करण्‍याच्‍या दृष्टीने आणि बाजाराभिमुख उत्‍पादन घेण्‍यासाठी या शेतकऱ्यांच्‍या कंपन्‍यांना उपयुक्‍त व सक्षम करण्‍याच्या दृ‍ष्‍टीने आत्‍मामार्फत दिशा देण्‍याचे काम होत आहे.येणाऱ्या काळात सक्षम शेतकरी उत्‍पादन कंपन्‍यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मदत होईल. शेतकऱ्यांच्‍या हिताचे त्यांना काळाच्या बरोबर नेऊन शेवटच्‍या शेतकऱ्यांपर्यंत सर्व कायदे पोहोचविण्‍यासाठी पुढील पाच वर्षांचे नियोजन करण्‍यात आले आहे.

शेतकरी मित्र हा गावस्‍तरावरील आत्‍मा संस्‍थेचा महत्‍वाचा दुवा आहे. शेतकरी मित्रांमार्फत विस्‍तार सेवा गावस्‍तरापर्यंत पोहोचविल्‍या जातात. शेतकरी सल्‍ला समिती आणि गट तंत्रज्ञान चमू व तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक तालुकास्तरावर वार्षिक कृती आराखडा तयार करण्‍यासाठी मदत करतात. त्‍यामुळे सर्व विस्‍तार कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यासाठी सहाय्य होते. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात 369 शेतकरी मित्र यासाठी कार्यरत आहेत. कृषी विद्यापीठामार्फत झालेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्‍यासाठी हे शेतकरी मित्र शेतकऱ्यांना मदत करीत आहेत. जिल्‍ह्यातील कृषि व संलग्‍न विभाग म्‍हणजेच पशुसंवर्धन दुग्‍ध व्यवसाय, रेशीम उत्‍पादन, मत्‍स्‍य विभाग, ग्रामोद्योग मंडळ, कृषि विद्यापीठ, कृषि महाविद्यायलय, कृषि विज्ञान केंद्र हे आत्‍मा संस्‍थेचे भागधारक आहेत.

यामुळे शेतकरी केंद्रीय कार्यक्रम राबविणे तसेच कृषि पूरक उद्योगांसाठी विविध विभागामध्‍ये समन्‍वय उत्‍तम प्रकारे करुन योजना तयार करणे हे ध्‍येय आत्‍मा संस्‍था सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात करत आहे. लहान कुटुंबात राहून छोट्या आकाराच्‍या क्षेत्रामध्‍ये शेती करणे जिकिरीचे असल्‍याने त्‍यांच्‍या शेतीस कायमस्‍वरुपी आर्थिकदृष्‍ट्या स्‍थैर्य प्राप्‍त होण्‍यासाठी शेतकऱ्यांचे समुह गट तयार केल्‍यामुळे शेती व्‍यवस्थापन व शेतीमाल विपणनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त झालेले आहे. असे 1100 समुह गट सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात तयार करण्‍यात आलेले आहेत. या गटांची आत्‍मा अंतर्गत नोंदणी करण्‍यात आली आहे.

आत्‍मामार्फत कोकमसाठी भौगोलिक निर्देशांक घेण्‍यात आलेला आहे. यामुळे सिंधुदुर्गच्‍या कोकमचे आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर ब्रॅडींग करणे सुलभ होणार आहे. कोकम उत्‍पादक शेतकऱ्यांचे जिल्‍ह्यात असे 40 गट स्‍थापन करण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक गटात 600 ते 700 शेतकऱ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्गात यंदाच्‍या वर्षी नाविन्‍यपूर्ण उपक्रमाद्वारे सेंद्रीय काजू लागवड कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्‍ह्यातील सुमारे 1700 एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती अंतर्गत काजू लागवड करण्‍यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्‍ह्याच्‍या यथार्थदर्शी कृषि संशोधन व विस्‍तार आराखड्यानुसार शेतकरी केंद्रस्‍थानी धरुन पुढील पाच वर्षात विकासाचे उद्दिष्‍ट ठेवण्‍यात आले आहे. यासाठी प्रमुख पिकांच्‍या उत्‍पादन वाढीतील अडसर दूर करुन शेतकऱ्यांना नफा मिळण्‍यासाठी उत्‍पादनवाढीबरोबरच शेतमालाची साठवणूक, पॅकिंग, प्रक्रिया, ब्रँडिंग पूरक उद्योग तसेच बाजार व्‍यवस्‍थापन यांचा सांगोपांग विचार आत्‍मामार्फत करण्‍यात आला आहे.

आत्‍मामार्फत शेती तंत्रज्ञानाची अधिक माहिती मिळण्‍यासाठी शेतकऱ्यांचा जिल्‍हास्‍तरावर, राज्‍यस्‍तरावर तसेच राज्‍याच्‍या बाहेरची शेती सहलीचे आयोजन करण्‍यात येते. आपली शेती किफायतशीर करण्‍याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत सुयोग्‍य वापर करण्‍यासाठी शेतकऱ्यांना आत्‍मामार्फत मोलाचे सहकार्य केले जात आहे. याबाबत संपर्कासाठी जिल्‍हास्‍तरावर आत्‍मा प्रकल्‍प संचालक जिल्‍हा परिषद सिंधुदुर्ग तसेच प्रत्येक तालुकास्‍तरावर तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक तालुका कृषि कार्यालयात कार्यरत आहेत.

लेखक – मिलिंद बांदिवडेकर,
जिल्‍हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग.

स्त्रोत – महान्युज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!